जो रामाचा नाही त्याला धनुष्यबाणाचे काम नाही-नवनीत राणा

0

खासदार नवनीत राणांची बोचरी टीका : उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमरावती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाश शिंदे (Eknash Shinde ) यांच्या नेतृत्वातील गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी दिला. या निर्णयाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे. विरोधकांकडून आयोगावर तर सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे सत्र सुरू आहे. चर्चेच्या गुऱ्हाळात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana ) यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या घरापुढे हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यावेळी त्यांना कारागृहातही जावे लागले होते. हाच धागा पकडून राणा यांनी ठाकरे यांच्यावर पुन्‍हा एकदा टीका केली आहे. जो रामाचा नाही, हनुमानाचा नाही त्याच्याकडे धनुष्यबाणाचे काम नाही, असे ट्विट करीत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचारधारा पुढे जिवंत ठेवतील, असा दावा करीत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा राणा दाम्पत्यासोबतचा वाद संपूर्ण राज्यात गाजला होता. त्यापूर्वीपासूनच उद्धव ठाकरे सातत्याने राणा दाम्पत्याच्या निशाण्यावर राहिले आहेत. आता पक्ष आणि चिन्हाबाबातच्या निकालानंतर नवनीत राणा म्हणाल्या की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले नाही ते सत्तेसाठी काय संघर्ष करू शकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांची विचारधारा आणि धनुष्यबाण चिन्ह पुढे नेतील असा माझा ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क आहे. बाळासाहेंबाच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच ते निवडणूकीत उतरवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवनीत राणा यांनी यापुर्वीही अनेकदा उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्‍या मातोश्री या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा म्‍हणण्‍याचा इशारा दिल्‍यानंतर नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून त्‍यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडलेली नाही.