
ज्ञानवापीचा धक्कादायक अहवाल!
वाराणसी varanasi -वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पार पाडण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आला आहे. प्राचीन मंदिरावर मशिदीची निर्मिती करण्यात आली असून मशिदीसाठी हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा वापर करण्यात आल्याचे वास्तव या अहवालातून उघड झाले आहे. मशिदीखाली हिंदू मंदिराचे अवशेष, चिन्ह, प्रतीके अद्याप दिसून येत असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याने हिंदु पक्षाकडून सातत्याने केले जात असलेले दावे खरे ठरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाने न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे या संपूर्ण परिसरातचे सर्वेक्षण केले होते. आधुनिक उपकरणांच्या आधारे कुठलेही उत्खनन न करता हे सर्वेक्षण पार पाडण्यात आले असून त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचा आदेश दिल्यावर काल तो सर्व पक्षकारांना पुरविण्यात आला. यापैकी हिंदू पक्षकारांचे वकील विष्णुशंकर जैन पत्रकार परिषद घेऊन या अहवालाची माहिती दिली. ज्ञानवापी परिसरात मंदिर असल्याचे तब्बल ३२ पुरावे सापडले असून अहवालात, स्वस्तिक चिन्ह, नागदेवता, कमळाचे फूल, देवी-देवतांच्या मूर्तींच्या भग्नावशेषांचाही उल्लेख आहे. मशीद उभारण्यासाठी मंदिराच्याच खांबांचा उपयोग करण्यात आल्याचे देखील अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालात नमूद माहितीनुसार, मशिद परिसरात खांबांवर तेलुगू व कन्नड भाषेतील मजकूरही आढळून आलाय. ज्ञानवापी परिसराच्या मध्यावरील चेंबरमध्ये फुलांचे नक्षीकाम आहे. पश्चिम दिशेला दगडांनी बंद केले आहेत. प्रवेशद्वारावर पक्षी व तोरण बनवलेले होते जे तोडण्यात आले आहे. मशिदीच्या समोर जास्तीत जास्त लोक गोळा व्हावे म्हणून पूर्वेस अतिरिक्त जागा व मोठा ओटा तयार करण्यासाठी तळघर तयार करण्यात आले आहे. एका स्तंभावर अनेक घंटा, चारही बाजूंनी दीप बनवलेले आहेत. त्यावर संवत १६६९ (म्हणजे १ जानेवारी १६१३) ही तारीख लिहिलेली आहे. तळघरातील ढिगाऱ्याखाली हिंदू देवी-देवतांचे प्रतीक चिन्हे दबलेली आहेत. मशिदीच्या खाली मूर्ती दडवलेल्या होत्या. एका खोलीत अरबी-फारशी भाषेत लिहिलेली एक शिळा सापडली. त्यावर मशिदीचे निर्माण मुघल शासक औरंगजेबाच्या २० व्या शासनकाळात (१६७६-७७) मध्ये केल्याचा उल्लेख आढळतो. याच शिळेवर १७९२-९३ मध्ये मशिदीची देखभाल-दुरुस्ती करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. या शिळेचे छायाचित्र एएसआयच्या १९६५-६६ च्या दस्तऐवजातही आहे. ताज्या पाहणीत ही शिळा मशिदीच्या एका खोलीत दिसून आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे औरंगजेबाचे चरित्र मासिर-ए-आलमगिरीमध्ये परिसरातील शाळा व मंदिरे पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचा उल्लेख आहे. अहवालानुसार, सर्वेक्षणात ज्ञानवापी परिसरातील शिलालेखांवर देवतांची तीन नावे उदा. जनार्दन, रुद्र, उमेश्वर आढळली आहेत. एक शिळा सापडली असून ती भग्नावस्थेत आहे. त्यामुळे जदुनाथ सरकार यांच्या संशोधनातील निष्कर्ष खरे ठरले आहेत. सध्याच्या वास्तूची पश्चिमेकडील भिंत हिंदू मंदिराचा भाग असल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद करण्यात आले आहे.