-पुरुषोत्तम आवारे पाटील
आपल्या शूर भूमी आणि लढवय्या महापुरुषांच्या इतिहासाचा विसर पडला की उपकाराची फेड अपकाराने करण्याची अवदसा कशी आठवते याचे बार्शीटाकळी येथील प्रकरण उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. गावाचा विकास सोडून इतर पंचायती करणाऱ्या या नगर पंचायतीच्या नऊ नगरसेवकांनी पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित पुतळ्याला उघड विरोध केला आहे. त्यावरून गेल्या तीन दिवसांपासून विविध पक्ष मस्तपैकी राजकीय पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम करीत आहेत. बार्शीटाकळी पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची आणि नगर पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आहे मात्र या पुतळा विरोधाच्या अग्रभागी सगळ्याच पक्षाचे नगरसेवक असल्याने एकाही पक्षाला तोंड वर करून आम्ही शिवभक्त असल्याचे सांगण्यास वाव उरला नाही एवढे नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला तोंडघशी पाडले आहे. शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणारे हे सगळे नगरसेवक मुस्लिम आहेत हा विचार करण्यासारखा योगायोग आहे.
एका बाजूला शिवजयंती कार्यक्रमात राज्यात मुस्लिमांचा पुढाकार सतत वाढत असताना या खेडेवजा शहरात नियोजनबद्ध मुस्लिम नगरसेवकांनी विरोध करणे ही कृती सामाजिक आरोग्याला घातक ठरणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव सुधारणावादी राजाला मानणारे आणि त्यांचा सन्मान करणारे लाखो मुस्लिम जाणीवपूर्वक पुढे येत असताना बार्शीटाकळी नगर पंचायती मध्ये अश्या नसत्या पंचायती करण्याची खुमखुमी कुणाच्या डोक्यातून बाहेर पडली याचा शोध घेण्याची गरज आहे. आजही या शहरातील सर्वच मुस्लिम शिवरायांना विरोध करणारे नाहीत. अनेकांना त्यांचे मुस्लिम मावळ्यांसाठी असणारे योगदान माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रसंगी स्वकीयांचा विरोध पत्करून आपल्या सैन्यात तैनात केलेल्या मुस्लिम सरदार,अधिकारी आणि सैनिकांची संख्या बघितली तर आगामी हजारो वर्ष कोणताही मुस्लिम या निधर्मी राजांबद्दल मनात अढी ठेवणार नाही.
ज्या राजांनी आपल्या राजधानीत रायगडावर मुस्लिम सैनिकांसाठी मशीद बांधली,ज्यांनी कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेचा योग्य सन्मान करून तिचा सन्मान केला.सैन्याच्या लुटीत इस्लामचा पवित्र ग्रंथ सापडला तर त्याचा योग्य लिहाज ठेवण्याच्या आज्ञा आपल्या सैनिकांना दिल्या त्या ” रहम दिल ” राजाच्या प्रती आजच्या काळात विरोध करण्याची भावना काही दिवट्या नगरसेवकांच्या मनात निर्माण होत असेल तर त्यांनी छत्रपतींचा इतिहास कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नसावा असे खेदाने म्हणावे लागेल. ज्या बार्शीटाकळी शहरात हे पराक्रमी नगरसेवक पुढे आले त्यांना कदाचित हे माहित नसावे की आपणच राजकीय विरोधकांना आयता मुद्दा उपलब्ध करून देत आहोत. सर्व पक्षांचे मुस्लिम नगरसेवक संभाव्य शिव पुतळ्याला विरोध करतात हे लक्षात आल्यावर याच शहरातील कौमी एकतेसाठी प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम पुढाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या डोक्यातील गैरसमज दूर करायला पाहिजे होता मात्र तसे होताना दिसले नाही.
या मतदार संघात गेल्या तीन टर्म पासून भाजपचे आमदार आहेत मात्र त्यांनीही कधी सर्वाना बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने विराजमान झालेला असता. आमदार भाजपचा,खासदार भाजपचा आणि वर सत्ताही भाजपची मग हे पुतळा प्रकरण एवढे दिवस लटकून का ठेवले जाते ? भाजपला प्रकरणे थंडबस्त्यात ठेवून त्यावर राजकीय डावपेच खेळायचे असतात हे आता लपून राहिलेले नाही. आ.हरीश पिंपळे एका सामान्य कार्यकर्त्यासारखे या घटनेचा निषेध करून मोकळे होतात. तुम्ही आमदार आहात याचा अर्थ त्या तालुक्याचे सुद्धा पालक आहात ना मग ,पालकांची भूमिका सोडून निषेध कसले करताय ? असा प्रश्न त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारण्याची गरज आहे. दुर्दैवाने निषेधाचा इव्हेन्ट करण्यात जिल्हा भाजप सुद्धा आघाडीवर दिसते.
ज्यांनी पुतळ्याला विरोध केला ते नगरसेवक विविध पक्षाचे आहेत. या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नगरसेवक झालेत परंतु पक्षाच्या धोरणाला हरताळ फासण्यापूर्वी आपल्या नेत्यांना विचारावे असे एकालाही वाटले नाही. जे विरोध करीत आहेत त्यांच्या आवारात नव्हे तर पंचायत समितीच्या आवारात हा पुतळा व्हायचा आहे ,तिथे नाक खुपसण्याचे यांचे धैर्य होत असेल तर या शहराचा आगामी काळ काही सुदृढ राहील असे म्हणायचे धाडस कुणी करणार नाही. ज्या शहरात शांती आणि सद्भावनेचा संदेश देणारा डॉ.मेहबूब राही सारखा शायर वास्तव्य करतो त्याच शहरात सामाजिक एकतेवर वार करणाऱ्या प्रवृत्ती वर तोंड काढत असतील आणि त्याचे परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतील तर या ऐतिहासिक बार्शीटाकळी शहरात वास्तव्य करणाऱ्या जिंदादिल मुस्लिमांनी त्याचा बंदोबस्त करायला हवा.