
जागतिक मुद्रण दिन
मानवाच्या इतिहासात जे मूलभूत क्रांतिकारी शोध लागले, ज्याने त्याच्या प्रगतीत व जीवनात आमूलाग्र बदल झाला. यात मुद्रण तंत्रज्ञानाचा समावेश होतो. मुद्रण तंत्रज्ञान येण्यापूर्वीचे व त्यानंतरचे जग याचे अवलोकन केल्यास या तंत्रज्ञानाची महती लक्षात येईल. साधारण ५०० वर्षांपूर्वी म्हणजे पंधराव्या शतकात मुद्रणाचा शोध लागला, हे तंत्रज्ञान १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात या तंत्रज्ञानाचा विकास होण्यास सुरुवात झाली.
मुद्रण कलेचा शोध योहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. यांच्या या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. तसेच सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे. योहान्स गुटेनबर्ग यांचा 24 फेब्रुवारी जन्मदिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो.
इ.स.1434 ते 1439 हा काळ मुद्रण क्षेत्रातील सर्वात महत्वाचा काळ होता. या काळात जर्मनीतील योहान गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण नावाचा प्रकार शोधला होता. गुटेनबर्ग मुद्रा, मातृका आणि शिशाचा उपयोग करून 40 पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग हे जर्मनीत चांदीचे कारागीर होते. इ.स.1455 साली गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा आणि मुद्रणाचा शोध लावला. त्यामुळे मु्द्रण पद्धतीत लागणारा वेळ कमी झाला. भारतामध्ये मुद्रण कला 1556 साली आली सर्वप्रथम गोव्यात पुर्तगालमधून छापखाना जहाजाने आला.
महाराष्ट्रात ही कला 1882 साली आली अमेरिकन मिशेनने या मुद्रणाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे सांचे बनवून मातृका तयार केल्या. त्यांच्या कडून गणपत कृष्णाजी पाटील हे अमेरिकन मिशन चे होते मातृका बनविण्यास शिकले आणि स्वतःचे मुद्रणालय 1827 रोजी सुरू केले. पाटील यांनी चुनखड्यावरून समपृष्ठ छपाई केली आणि तंत्राची निर्मिती करून पंचांगाची छपाई केली. अक्षर मुद्रणालय देखील त्यांनी सुरू केले.
हस्ताक्षराशिवाय यंत्राद्वारे कागदावर अक्षरे उमटवणे म्हणजे मुद्रण, असे साधारण सुरुवातीच्या काळात याचे स्वरूप होते. हा शोध अशासाठी क्रांतिकारी मानला पाहिजे, कारण त्या अगोदर स्वहस्ते केलेले लेखन हेच साहित्य, विचार, वाड्मय, धर्मग्रंथ, माहिती, ज्ञान, इतिहास व नोंदी पोहचिवण्याचे माध्यम होते. उदा. एखादा धर्मग्रंथाच्या प्रति काढावयाच्या झाल्यास तो ग्रंथ पूर्णतः हाताने लिहून काढावा लागत असे, त्यात जर तो अनेक पानांचा असल्यास असा एक ग्रंथ लिहावयास वर्षभराचा कालावधीही लागत असे. त्यामुळे ज्ञान-विज्ञान, साहित्य, अगदी धार्मिक विचार पोचविण्यासही खूप मर्यादा होत्या. ग्रंथ, पुस्तके, मासिके, वृत्तपत्र आणि चलनी नोटा यांचा जन्म हा छपाई तंत्राच्या विकासानेच झाला. छपाई तंत्राच्या आगमनानंतर ज्ञानविस्ताराचे एक नवे क्षितीज उदयास आले, त्याची तुलना करावयाची झाल्यास आजच्या जगात इंटरनेटचे तंत्रज्ञान आल्यानंतर जो अफाट ज्ञानविस्तार झाला, तसाच प्रभाव मुद्रण तंत्रज्ञानाने घडविला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.
मुद्रण तंत्रज्ञानाचा महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करायचा झाल्यास, खिळे जुळवून केलेले ट्रेडल प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग व सध्याचे डिजिटल प्रिंटिंग हे प्रमुख टप्पे म्हणता येतील. नवे येणारे तंत्रज्ञान हे जुन्या तंत्राची जागा घेते व त्यानंतर आधीचे तंत्र कालबाह्य होते, हे सूत्र येथेही लागू होते. ऑफसेट प्रिंटिंग आल्यावर ट्रेडल कालबाह्य झाले आणि आता डिजिटल प्रिंटिंग ऑफसेट प्रिंटिंगला आव्हान देत आहे.
गेल्या १०-१५ वर्षांत झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे अनेक क्षेत्रावर त्याचे खोलवर परिणाम झाले, तसे या मुद्रण क्षेत्रावरही झाले आहेत. माहितीचा प्रसार आता इंटरनेटच्या आणि मोबाईलच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे मुद्रित माध्यमाची या क्षेत्रावर असणारी मक्तेदारी कमी होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे आज जरी छपाई तंत्राज्ञान पूर्वीपेक्षा वेगाने होत असले, तरी त्याची तुलना इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वेगाशी करता येणार नाही. तसेच, चलित दृश्य, ध्वनी आणि आता विकसित होत असलेले त्रिआयामी तंत्रज्ञान. आजच्या तरुण पिढीमध्ये पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्र वाचणारे फार थोडे सापडतात. दूरचित्रवाणी व इंटरनेटच्या माध्यमांपुढे मुद्रण क्षेत्र खूपच कमजोर ठरत आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत भेटकार्ड, आमंत्रणकार्ड यांना फाटा देऊन तो संदेश सोशल मीडियाद्वारे पोहचविला जातो. पुस्तके, मासिके, नियतकालिके, जाहिराती, माहितीपत्रके आणि फॉर्म्सही आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागली आहे.
मानवाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या क्षेत्राच्या भविष्याचा जेव्हा विचार होतो, तेव्हा चिंता वाटावी, अशी स्थिती आहे. अजूनही छापील साहित्य हे इतर माध्यमांपेक्षा जास्त विश्वासू मानलं जातं. हाच त्याचा विश्वास आपल्या मनामध्ये कायमचा मुद्रित करून ठेवा.
आजच्या जागतिक मुद्रण दिनानिमित्ताने तुम्ही आम्ही याचा जरूर विचार करूयात व शक्य तिथे मुद्रित साहित्याचा वापर करूयात
संकलन
रमेश केशव पाटील
डी टी पी पर्यवेक्षकबृहन्मुंबई महानगर पालिका मुद्रणालय