“शिंदे गटालाच ‘चोरमंडळ’ म्हणालो”, संजय राऊतांचा दावा

0

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Mp Sanjay Raut) काही दिवसांपूर्वी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला गेला असून संजय राऊत यांनी विधीमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहून हक्कभंग समितीतील सदस्यांवरच आक्षेप घेतला आहे. हक्कभंग समितीतील सदस्य तटस्थ असावेत तसेच या समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर व संपूर्णतः घटनाबाह्य सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे राऊत म्हणाले.

याप्रकरणी भाजपासह शिंदे गटाच्या काही सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीही स्थापन करण्यात आली.राऊत यांनी उत्तर नमूद केलेय की, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले आहेत. तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते. पण या समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते. हे संसदीय लोकशाही परंपरेस धरून नाही, असा दावाही त्यांनी केलाय. विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीही माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असे माझे विधान असून मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख केल्याची भूमिका राऊत यांनी घेतली आहे.