Home Artical Blog भीषण उन्हाळ्यातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची ‘अग्निपरीक्षा’

भीषण उन्हाळ्यातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची ‘अग्निपरीक्षा’

0

यंत्रणेवर वाढता ताण तरीही कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

नागपूर(Nagpur), 25 एप्रिल 2026: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या सूर्याच्या प्रखर प्रकोपाचा सामना करत आहे. वाढत्या तापमानाचा पारा 45 अंशांच्याजवळ गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम वीज वितरण यंत्रणेवर दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली असताना, महावितरणसमोर ही यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

यंत्रणेवर निसर्गाचा आणि लोडचा दुहेरी मारा: उच्च तापमानामुळे केवळ नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत नसून, वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्स, फिडर पिलर आणि उच्च दाबाच्या केबल्सनाही ‘घाम’ फुटला आहे. उन्हाळ्यात एसी, कुलर, रेफ्रिजरेटर आणि पंख्यांचा वापर एकाच वेळी वाढतो. यामुळे विजेची मागणी अचानक सर्वोच्च स्तरावर (Peak Demand) पोहोचते. या वाढलेल्या लोडमुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलचे तापमान झपाट्याने वाढते, ज्यामुळे ते जळण्याचे किंवा तांत्रिक बिघाड होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी जुन्या झालेल्या केबल्स ओव्हरलोडमुळे वितळण्याच्या घटनाही समोर येत आहेत.

ट्रान्सफॉर्मर्सना थंडावा देण्यासाठी अनोखी ‘कुलिंग’ मोहीम: यंत्रणेचे नुकसान टाळण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने आता तांत्रिक उपाययोजनांसोबतच संरक्षक पावले उचलली आहेत. अनेक महत्त्वाच्या सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर्सचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना मोठ्या कुलरद्वारे थंडावा दिला जात आहे. काही ठिकाणी पाण्याचे फवारे मारून किंवा विशेष शेड उभारून उपकरणांचे संरक्षण केले जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे ‘ट्रिपिंग’ कमी करण्यासाठी लोड बॅलन्सिंगचे सूक्ष्म नियोजन केले जात असून, तांत्रिक पथके 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

भर उन्हात कर्मचाऱ्यांची ‘कर्तव्य साधना’: या भीषण उष्णतेत जेव्हा नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, अशा वेळी महावितरणचे लाईनमन आणि तांत्रिक कर्मचारी भर दुपारी खांबावर चढून किंवा जमिनीखालच्या केबल्स दुरुस्त करताना दिसत आहेत. प्रखर उन्हात आणि गरम हवेच्या झुळका अंगावर झेलत, घाम गाळत हे कर्मचारी केवळ ग्राहकांना दिलासा देण्यासाठी झटत आहेत. अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागूनही, ‘सेवा हेच कर्तव्य’ मानून हे वीजदूत अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या या संघर्षाची दखल घेणे आणि त्यांना सहकार्य करणे ही आज काळाची गरज आहे.

सुरक्षिततेसाठी महावितरणचे कळकळीचे आवाहन: महावितरणने नागरिकांना आपल्या घरातील वीज यंत्रणेची सुरक्षितता तपासण्याचे आवाहन केले आहे. अनेक घरांमध्ये जुनी वायरिंग असते, जी एसी किंवा कुलरच्या लोडमुळे गरम होऊन शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण करू शकते. ग्राहकांनी आपल्या घरातील ‘अर्थिंग’ योग्य असल्याची खात्री करावी आणि शक्य असल्यास उच्च क्षमतेच्या उपकरणांचा वापर टप्प्याटप्प्याने करावा, जेणेकरून स्थानिक ट्रान्सफॉर्मरवर एकदम ताण येणार नाही.

समन्वय आणि सहकार्याची अपेक्षा: वाढत्या तापमानामुळे यंत्रणेवर मर्यादा येत असल्या तरी, महावितरणचे प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खंडित वीजपुरवठा कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नैसर्गिक आपत्तीसारख्या या परिस्थितीत नागरिकांनी संयम पाळावा आणि तांत्रिक बिघाड झाल्यास कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. महावितरणची ही अहोरात्र चाललेली धावपळ केवळ ग्राहकांना सुखद गारवा मिळावा यासाठीच आहे, हे लक्षात घेऊन वीज बचतीचाही संकल्प करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.