“समितीचा निर्णय मला मान्य असेल..”: शरद पवार

0
शरद पवार

मुंबई: अध्यक्षपदाच्या मुद्यावर नेमण्यात आलेल्या समितीचा जो काही निर्णय येईल, तो आपल्याला मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सांगितले. “राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते…” असेही शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) म्हणाले. “मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, असे मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
पवार म्हणाले, “1 मे1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझे 1 मे सोबत वेगळे नाते आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केले होते. मी युवकांची मते विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.”

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांच्या निर्देशानुसार ती 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे रोजीच मिळणार आहे.