गोंदिया – जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून काल पुन्हा रात्रीपासून पावसाला सुरवात झाली. पहाटे पासून पाऊस सुरू असल्यामुळे भर उन्हाळ्यात आता थंडगार वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला असून धान पिकासह अनेक पिकांचे नुकसान या अवकाळी पावसाने होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे चिखलदऱ्यात धुक्यांची चादर
अमरावती – विदर्भात उन्हाळ्यात तापमान वाढत असते. मात्र पर्यटकांनी गजबजलेल्या मेळघाट, चिखलदरा परिसरात उन्हाळ्यात देखील यावेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत असल्याने झाडांची पाने देखील हिरवीगार झाली आहे. मेळघाट आणि चिखलदऱ्यात काही दिवसांपासून थंड वातावरण झालं आहे. आणि चिखलदऱ्यात सध्या धुक्यांची चादर उन्हाळ्यात पसरलेली पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे चिखलदराच्या सौंदर्यात भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात नदी; नाल्यांना पूर
वर्धा: वर्धा जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचले असून नदी , नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. पाणी साचल्यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.