भांडणाऱ्या खेळाडूंवर आणखी कठोर कारवाई हवी-सुनील गावसकर

0

मुंबई : आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील जोरदार वादाची चर्चा अद्यापही सुरुच असून बीसीसीआयने गोंधळ घालणाऱ्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर दंडाचा बडगा उगारत दोघांची संपूर्ण मॅच फी दंड म्हणून वसुल केली तर नवीनला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. विराट कोहलीला या भांडणामुळे एक कोटीचा फटका बसला. बीसीसीआयच्या नाराजीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी (Sunil Gavaskar on Kohli-Gambhir Spat) नाराजी व्यक्त केली आहे. शेकडो कोटी रूपये कमावणाऱ्या खेळाडूंना एखाद्या कोटीने काय फरक पडणार? असा सवाल उपस्थित करून गावसकर यांनी आणखी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

या वादावर भाष्य करताना गावसकर म्हणाले की, मी तो सामना थेट पाहू शकलो नाही. मी नंतर या घटनेचे व्हिडिओ पाहिले. या गोष्टी बघायला चांगल्या वाटत नाहीत. सामन्याचे शंभर टक्के मानधन कापून घेण्याने खेळाडूंना काय फरक पडणार आहे. बेंगळुरुने विराटला बहुदा 17 कोटी रूपये दिले आहेत. जर आपण हंगामातील 16 सामन्यांसाठी 17 कोटी असे पकडले तर त्याला 1 कोटी रूपयांचा दंड झाला असेल. मात्र या 1 कोटी दंडाने विराट कोहलीला काय फरक पडेल? ही काही मोठी शिक्षा नाही, असे गावस्कर म्हणाले. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी खेळाडू आणि स्टाफवर काही सामन्यांची बंदी घातली पाहिजे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. या गोष्टी पुन्हा करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, असे पाऊल उचलले गेले पाहिजे. 10 वर्षापूर्वी हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यासोबत जे झाले, तसे काही करण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्या खेळाडूंना काही सामन्यासाठी निलंबित केले गेले पाहिजे, असे गावस्कर म्हणाले. मैदानावरील भांडणे रोखण्यासाठी खेळाडूंमध्ये भिती निर्माण होईल, यासाठी संघाचे नुकसान होईल, अशा उपाययोजना झाल्या पाहिजे, असे गावसकर म्हणार.