सुमित्रा महाजन यांचे सूचक संकेत : राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा
मुंबई. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल कोण? याबाबतचे आराखडे रंगविले जात आहेत. अलिकडेच पंजाबचे माजी मुख्यंमत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्तीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन (Former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan ) यांचेही नाव पुढे आले. पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल, असे सूचक संकेतच सुमित्रा महाजन यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. आता वय झाले आहे. पण, नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या राज्यपालपदी नियुक्तीच्या चर्चेला बळ मिळाले आहे. डोंबिवली येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात त्यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन यांची पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद यांनी भारत हा विश्वगुरू होणार हे सांगितले. आपल्या देशाची प्रगती सध्या याच पथावर आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ठामपणे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे भारताबद्दल आदर निर्माण झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या मुलाखतीत त्यांनी नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा प्रवास उलगडला.
जबाबदारी वाढली
लोकसभेचे अध्यक्षपद भूषवताना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधताना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव महाजन यांनी सांगितला. त्यांनी इंदूरमधील अहिल्याबाई स्मारकाची माहितीही दिली.
हा चुकीचा पायंडा
देशाची प्रगती साधण्याची जबाबदारी केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर नागरिकांचीही आहे. आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल, तर मतदारांनी त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आजकाल देवालाही वाटून घेतले जाते, तसेच मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे, हा चुकीचा पायंडा आहे, असे त्या म्हणाल्या.