धीरेंद्र शास्त्रींना जादूगारांचे आव्हान
अलवर. दिव्यशक्तीच्या दाव्यामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri of Bageshwar Dham ) यांना आता जादूगारानेही (magician) आव्हान (challenge) दिले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना यापूर्वी आव्हान दिले होते. त्या पाठोपाठ आता जादूगारही समोर आले आहेत. तुम्ही दिव्यत्व सिद्ध करा, सर्व जादूगार तुमच्या आश्रमात सेवा देतील, अशी तयारीही त्यांनी दाखविली आहे. धीरेंद्र शास्त्री भाविकांच्या मनातील प्रश्न, समस्या स्वतःच जाणतात. त्या आधिच कागदावर लिहून ठेवतात, असा त्यांच्या भाविकांचा दावा आहे. बालाजीच्या आशिर्वादाने आपण हे करीत असल्याचे धीरेंद्र शास्त्रींचे म्हणणे आहे. त्यांचा हा दावा देशातील प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांनी खोडून काढला आहे. जगात कुठेही दिव्यशक्ती नसून जादू हीच एक विद्या असल्याचे त्यांनी सांगितले. जादू ही अलौकीक शक्ती किंवा चमत्कार नसून ते विज्ञान कलेचे रूप आहे. आम्ही ज्या पद्धतीने ते दाखवून देतो, त्यातून ही जादू असल्याचा भास समोरच्या व्यक्तींना होतो, असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.
जादू ही मिक्स आर्ट
मेडिटेशन, योगा आणि बहुरंगी कलांचा समावेश जादूच्या कलेत आहे. मिक्स आर्ट किंवा जादू असेही या कलेला म्हटले जाते. अलवर येथे जादूचा शो करत असताना शिव कुमार यांनी बागेश्वर धामच्या महाराजांना आव्हान दिले आहे. जादूगरांसमोर तुमची दिव्य शक्ती किंवा अलौकिक शक्ती दाखवा, सिद्ध करा. तसे केल्यास सर्वच जादूगार तुमच्या आश्रमात सेवा देतील, असे चॅलेंज जादूगार शिव कुमार यांनी बागेश्वर बाबांना केले आहे.
२८ जानेवारीला जादूगारांचा मेठा
देशातील सर्वच जादूगरांना २८ जानेवारी रोजी अलवर येथे बोलावण्यात आले आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्याबाबत चर्चेची शक्यता आहे. शिव कुमार यांची भूमिका लक्षात घेतल्यास जादूगारांमधून धीरेंद्र शास्त्री यांचा विरोध सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सनातन धर्मात देव आहे, आणि देव असायला पाहिजे. मात्र, देवाच्या नावाने चमत्कार ही अंधश्रद्धा आहे, असेही शिव कुमार यांनी सांगितले.