-अनिल देशमुख यांची मागणी
नागपूर : गारपीट व अवकाळी पावसाने विदर्भात गहू, चना व इतर रब्बी पिकांसोबत संत्रा व मोसंबी, भाजीपाला पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.
गेल्या दोन दिवसापासून गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदर होळीच्या वेळेस सुध्दा अश्याच प्रकारचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहे. परंतु त्याला सुध्दा मदत जाहीर करण्यात आली नाही. आता परत संकट असल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली. नागपूर जिल्हात आठ महिन्यापुर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे नुकसान होवूनही त्याची कोणतीही मदत देण्यात आली नाही. नुकसानीचे पंचनामे करुन तसा अहवाल सुध्दा राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याला सुध्दा तातडीने मंजूरी देण्याची मागणी देशमुख यांनी विधानसभेत केली.