नागपूर :भारतीय जनता युवा मोर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ३० हजार पोस्टकार्ड पाठवणार आहे. भाजयुमोने उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर कलंक शब्दासह केलेली टीका लक्षात घेता ‘देवेंद्रजी आमचा अभिमान’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही ३० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. केवळ २२ च्या वर्षी रामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होणारे, नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंत यशस्वी वाटचाल आणि विकासाचा चेहरा असलेले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा अभिमान आहेत, हे उद्धव ठाकरे यांना कळावे म्हणून मातोश्रीवर आम्ही ही पत्र पाठवतोय, असे भाजप नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. २२ जुलैपर्यंत भाजप युवा वॉरीयर्स सर्वसामान्यांकडून पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्याकडे पोस्टकार्ड पाठवणार आहेत. पुतळे जाळणे, शिव्या देणे योग्य नाही. कारण आमचा नेता हा सकारात्मक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस म्हणजे केवळ काहीतरी शिकून राजकारणात आलेले नेते नाहीत, तर एलएलबी, एलएलएम आणि तेसुद्धा गोल्ड मेडलिस्ट असलेले नेते आहेत यावर जोशी यांनी भर दिला.