मुंबई : “तुम्ही स्वा. सावरकरांचा अपमान करणार असाल, तर कोण ऐकून घेणार? तुमचे नेते आमच्या पंतप्रधानांचा अपमान करत असतील, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही वारंवार देशाचा, पंतप्रधानांचा, स्वा. सावरकरांचा अपमान करत असाल, तर कोण खपवून घेणार? सगळ्यांनीच बोलताना तारतम्य पाळले पाहिजे. खोके, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते?” या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दोन दिवस शिल्लक असताना विरोधक (Assembly Budget Session-2023) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कमालीचा तणाव बघायला मिळत आहे. विरोधी पक्षांनी आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निरमा आंदोलन केले. नेत्यांच्या फोटोला निरमाने आंघोळ घालत घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यातील अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना अजूनही न मिळालेली मदत, पंचनामे, गुढीपाडवा उलटून गेला तरी आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी न मिळाल्यामुळे विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी देखील विरोधकांनी यावेळी केली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याने संतप्त झालेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन भाजपकडून करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने हे कृत्य करणाऱ्या सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र आक्षेप घेतला. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब झाले होते.