नागपुरात २४ला ‘नाईट विथ आझादी’

0

नागपूर – स्त्रीपुरुष समानतेच्या युगात आजही महिलांना पुरुषी दबावाखाली वावरावे लागते. दिवसभर नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर तिला मनासारखे काहीच करता येत नाही. एक स्त्री म्हणून तिच्या इच्छा तिला आतल्या आत दाबून टाकाव्या लागतात. या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी आणि मनाला आनंदी वाटेल असं वावरण्यासाठी महिलांना एक संधी मिळावी, कामकाजी, घरगुती अशा सर्वच गटातील महिलांना रात्री घराबाहेर पडण्याच्या दहशत आणि भीतीतून मुक्त करून आम्हीही निर्भय आहोत हे दाखवून देण्यासाठी सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाउंडेशनने “नाईट टी विथ आजादी” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शंकर नगर चौकात शुक्रवार दिनांक २४ मार्चला रात्री ११.३० वा. करण्यात आले आहे. यादरम्यान समाजाच्या विविध क्षेत्रातील महिला रात्री ११.३० वा. चहा टपरीवर एकत्र येऊन चहाचा आस्वाद घेतील. नागपूरच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी आणि इतर महिला या अभियानात सहभागी होणार आहेत. या अभिनव उपक्रमात नागपुरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांनी केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा