मुंबई : सातत्याने संकटात सापडणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले जात नव्हते. पावसाळ्यातील अतिवृष्टी तसेच इतर वेळी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. (State Cabinet Decisions) हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहीर करणे सरकारला शक्य होणार आहे. खरीपातील अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. मात्र, सरकारी नियमानुसार अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत जाहीर करता येत नव्हती. मात्र, सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती निश्चित केल्याने नुकसानग्रस्त पिकांसाठी भरपाईची एक रक्कम निश्चित केली जाईल व त्यानुसार नुकसानग्रस्तांना सरकारकडून थेट आर्थिक मदत जाहीर केली जाईल. यासंदर्भात बोलताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पीकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळायची नाही त्या पिकांचाही आता समावेश करण्यात आला आहे.