नवी दिल्लीः फोर्ब्सच्या ताज्या यादीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे टॉप-10 उद्योगपतींमधील स्थान कायम आहे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते 9 व्या स्थानावर (Reliance Chairman Mukesh Ambani in Top-10 list) आहेत. 2022 मध्ये ते 90.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 10 व्या स्थानावर होते. अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 24व्या क्रमांकावर आहेत असून जानेवारी महिन्यात अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती सुमारे126 अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी यांच्या संपत्तीत मोटी घट झाली असून आता ती 47.2 अब्ज डॉलर्स आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर, एलन मस्क दुसऱ्या आणि जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या या अब्जाधीशांच्या यादीत एकूण 169 भारतीयांची नावे आहेत. गेल्या वर्षी त्यांची संख्या 166 होती. श्रीमंत भारतीयांच्या यादीत अंबानी, अदानी यांच्यानंतर शिव नाडर, सायरस पूनावाला, लक्ष्मी मित्तल असून सावित्री जिंदाल या सहाव्या क्रमांकावर आहेत. सातव्या क्रमांकावर दिलीप संघवी, आठव्या क्रमांकावर राधाकिशन दमाणी, ९व्या क्रमांकावर कुमार मंगलम बिर्ला आणि दहाव्या क्रमांकावर उदय कोटक यांचा समावेश आहे.