मुंबई: उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केलाय. त्यामुळे भाजप त्यांच्यासोबत जाणार नाही. सध्यातरी भाजपची दारे बंदच आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. विधानसभेच्या 200 जागा आणि लोकसभेच्या 48 जागा जिंकण्याचे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपचे मनभेद झाले असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. त्याचवेळी अजित पवार यांनी भाजपचा विश्वासघात केलेला नाही, असे स्पष्ट करताना त्यांच्याशी भाजपचे केवळ मतभेद असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारले असता बावनकुळे यांनी संजय राऊत हे सातत्याने वैयक्तिक टीका करीत असून त्यांनी विकासावर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला चांगले यश मिळेल. राज्यात भाजपचे १२४ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी त्यांना आम्ही शंभर टक्के मदत करु, असेही बावनकुळे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची कामगिरी माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पसंत आहे का, या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर तेच देऊ शकतील.