नागपूरः (NAGPUR)देशात नेहमीच आध्यात्मिक लोकशाही राहिलेली आहे आणि भारताचे हेच वैशिष्ट्य जगभरात ‘हिंदुत्व’ म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी (RSS Saha Sarkaryavaha Dr. Manmohan Vaidya) नागपुरात बोलताना केले. इंग्रजीत त्याला ‘हिंदुइजम’ म्हणजे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. धंतोली येथील हिंदु धर्म-संस्कृती मंदिरच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ‘सनातन भारत’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे आयोजित व्याख्यानात डॉ. वैद्य यांनी आपले विचार मांडले. आपल्या भाषणात डॉ. वैद्य यांनी देशातील जातीव्यवस्थेचा उल्लेख करताना जातीव्यवस्थेला धर्मशास्त्राचा आधार नसल्याचे सांगितले. व्यवसायानुसार जाती पडल्या असतील पण त्याला धर्मशास्त्राचा कुठलाही आधार नसून जातीभेद पाळणे हे वाईटच असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मावर ग्लानी येते तेव्हा आध्यात्मिक शक्तींचा उदय होतो, हे सत्य या देशाने वारंवार अनुभवले आहे. देशात बाबराच्या रुपात परकीयांचे आक्रमण झाले, तेव्हा देशात संत परंपरेच्या माध्यमातून आध्यात्मिक शक्तींचाही उदय झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मंदीरात जाणे, पुजापाठ करणे म्हणजे धर्म नाही. हा उपासनेचा भाग आहे. धर्म हा आचरणाचा भाग आहे. डोळसपणे जगाकडे पाहणे आणि अहंपणाचा त्याग करणे म्हणजे धर्म आहे. समाजाकडून जे काही मिळवले, ते परत करण्याचा भाव म्हणजे धर्म आहे, अशी धर्माची व्यापक व्याख्या वैद्य यांनी सांगितली.
वैद्य म्हणाले की, भारतीय परंपरेत आपले आहे तेवढेच स्वीकारण्याचा भाव आहे. भ्रष्टाचार (Corruption)ही भारताची परंपरा नाही. संपूर्ण जग भौतिक जीवनशैलीपायी अस्वस्थता अनुभवत असताना सर्वांना सुखी करण्यासाठी आध्यात्माची गरज आहे. या जगाला आध्यात्मिक परंपरेने एकत्र जोडणे ही भारताची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.