दर्यापूर: महाराष्ट्राच्या अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे, ज्यापैकी जवळपास तीन हजार चौ. किमी क्षेत्रांत खाऱ्या पाण्याची समस्या आहे. या समस्येवर मात करून शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या (Minister Nitin Gadkari Reviews Water Project) प्रेरणेतून अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे साकारल्या जात असलेल्या गोड पाण्याच्या प्रायोगिक प्रकल्पाची आज गडकरी यांनी खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार श्री वसंत खंडेलवाल यांच्यासह पाहणी केली.
या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर या खाऱ्या पाण्याच्या पट्ट्यात येत असलेल्या अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतील एकूण ८९४ गावांना जमिनीपासून केवळ ५० फूटांच्या खोलीवर गोडे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
बोराळा गावात एका नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. या नाल्यासह एक मोठे शेततळे तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये ९ कोटी ४० लाख लिटर पावसाचे गोड पाणी साठवण्यात येणार आहे. जमिनापासूनच्या पहिल्या वाळूच्या थरातून अंदाजे ३ कोटी लिटर खारे पाणी बाहेर काढून फेकले जाईल, ज्यामुळे ९ कोटी लिटर पाणी बंधाऱ्यात थांबेल व ३ कोटी लिटर पाणी वाळूच्या थरात जाईल. बोराळ्याच्या या एका प्रायोगिक प्रकल्पामुळे अशा एकूण १२ कोटी लिटर गोड पाण्यावर ४० हेक्टर म्हणजेच १०० एकर जमिन बारमाही ओलिताखाली येईल. टिंबर सिंचनाचा प्रयोग केला, तर २०० एकर जमिनीला बारमाही गोड पाणी उपलब्ध होईल.
या पूर्ण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन नाही, स्थलांतर नाही तसेच पुनर्वसनही नाही त्यामुळे खर्च कमी असेल. प्रकल्पामुळे खारपाण पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल व शेतीसाठीही मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होईल. पूर्णा नदीला येणाऱ्या महापूराची तीव्रता कमी होईल. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला, तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रकल्पात निघालेली काळी माती शेतकऱ्यांची जमिन सुपिक करू शकेल. पिवळ्या मातीने गावरस्ते, शिवरस्ते, शेतरस्ते तयार केले जाऊ शकतील. प्रकल्पात वाळूच्या थरातून उपलब्ध होणारे खारे पाणी शेततळे करून साठवले, तर त्यात मत्स्य व्यवसाय सुरू करता येईल, ज्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ४ लाख ६९ हजार २०० हेक्टर खारपाण पट्ट्यातील जमिनीवर असे ९४० बंधारे बांधले, तर ४,६०,६०० हेक्टर जमिनीला मुबलक प्रमाणात बारमाही गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल.