अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्र!

0

बुलढाणा : मोठ्या प्रमाणावर अपघातांसाठी सध्या चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून उपाययोजना सुरुच आहेत. आता बुलडाणा जिल्ह्यात पिंपळखुटा गावाजवळ ज्या ठिकाणी मोठा अपघात झाला, त्या ठिकाणावर महामृत्यूंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली असून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचाही जप करण्यात आला.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्राच्या वतीने बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना शांती लाभावी आणि भविष्यात या महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी हा उपाय करण्यात आला. सुमारे दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून या महामृत्युंजय यंत्राची स्थापना केली. तसेच महामृत्युंजय मंत्राचा सव्वा कोटी जपही करण्यात आला. गेल्या महिन्यात सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.