मुंबई : राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते. पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे. त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. यासाठी भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प आजच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे (Maharashtra Congress Committee Meeting) पार पडली.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, राज्यातील यापुढचा कालखंड निवडणुकीचा असून त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मोदी सरकारने राहुल गांधी यांना संसदेत बोलूच दिले नाही. त्यांची मुस्कटदाबी केली. राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेची भाजपाला भिती वाटते म्हणूनच ही मुस्कटदाबी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेसला चांगले दिवस आहेत पुन्हा पक्षाला सोनियाचे दिवस येतील.
अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आणि मोदी अदानी संबंध काय असा प्रश्न विचारताच मोदी सरकारने राहुल गांधींवर आकसाने कारवाई केली. हा प्रश्न एकट्या राहुल गांधी यांचा नाही तर सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला असे म्हटले तर त योग्यच आहेत. राहुल गांधींना दोषी ठरवण्यामागचा घटनाक्रम नीट पहा, हे सर्व जाणीवपूर्वक, सुडबुद्धीने केलेले षडयंत्र आहे हे दिसते.
पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, चोरांनाच टार्गेट केले जाते आणि अदानीला हिंडनबर्ग ने टार्गेट केले. जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती अदानींच्या कंपन्यांतील घोटाळा हिंडनबर्ग अहवालाने बाहेर काढला आहे. हिंडनबर्गच्या अहवालाला अदानी उत्तर देऊ शकले नाही तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकले नाही. अदानीचे ९ लाख कोटी रूपये पाण्यात गेले. जनतेच्या न्यालयात हिंडनबर्गला न्याय मिळाला. राहुल गांधींनी मोदी अदानींचे सत्य जगासमोर आणले. कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून राहुलजींचा आवाज बंद करण्यासाठीच सदस्यत्व रद्द केले. अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून? जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, ती झालीच पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या कार्यकारिणी बैठकीत चार ठराव मांडण्यात आले ते पुन्हा मंजूर करण्यात आले.