मुंबईः ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra maja, Garja maharashtra maja) हे अजरामर गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात (Maharashtra`s official State Song) आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना एक सूचना केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून स्थापन समितीकडून तीन गीतांपैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता हे गीत नियमितपणे शासकीय कार्यक्रमांमध्ये लावले जाणार आहे.
कवी राजा बढे यांच्या लेखनीतून उतरलेल्या या गीताची महाराष्ट्र गौरव गीत अशी ओळख असून सीमा आंदोलन आणि संघर्ष काळामध्ये हे गाणे आंदोलकांच्या तोंडी होते. या गीताला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले असून ते शाहिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले आहे.