माफिया मुख्तार अंसारी, खासदार अफजल यांना कारावासाची शिक्षा

0

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अंसारी आणि त्याचा भाऊ व बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी या भावंडांना १६ वर्षे जुन्या गँगस्टर प्रकरणात (Mukhtar & Afzal Ansari conviction) गाझीपूरच्या एमपीएमएलए न्यायालयाने अनुक्रमे १० व ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मुख्तारला ५ तर अफजलला १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. या निर्णयानंतर अफजल अन्सारीचे लोकसभेचे सदस्यत्व देखील धोक्यात आले असून ते रद्द होऊ शकते. न्यायालयाकडून दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार आणि खासदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. दरम्यान, या निर्णयाला खासदार अफजल अन्सारी उच्च न्यायालयात अपील करू शकतात.
न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी मुख्तार अंसारी हा बांदा तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे उपस्थित झाला. तर अफजल स्वतः न्यायालयात हजर होता. कृष्णानंद राय (2005) यांच्या हत्येनंतर 2 वर्षांनी 2007 मध्ये पोलिसांनी मुख्तार अन्सारी व त्याच्या भावावर गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा राय यांच्या हत्येनंतर झालेल्या जाळपोळ, आंदोलन व व्यावसायिक नंदकिशोर रुंगटा यांच्या अपहरण-हत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे.कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी अन्सारी बंधूंची 4 वर्षांपूर्वीच निर्दोष सुटका झाली. गँगस्टर कायद्याचे हे प्रकरण या खटल्याशी निगडित आहे.
न्यायालयाच्या निर्णयापूर्वी कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय यांनी आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, अफजल अन्सारी यांनी नुकतेच सांगितले होते की, न्यायालयाने आमची या प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. त्यामुळे गँगस्टर कायद्यांतर्गत सुरू असणाऱ्या या खटल्याला कोणताही आधार नाही. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.”
एकेकाळी माफिया मुख्तार आपल्या 786 क्रमांकाच्या खुल्या जीपने घराबाहेर पडत होता. तेव्हा लोक आपला रस्ता बदलत होते. एकदा तर योगी आदित्यनाथ यांच्यावरील हल्ल्यातही मुख्तारचे नाव आले होते. त्याच्यावर भाजपच्या आमदारावर एके४७ रायफलमधून जवळपास 400 फैरी झाडल्याचाही आरोप झाला होता.