आमदार अमोल मिटकरी यांचे वादग्रस्त वक्तव्य
अकोला. दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj, Bageshwar Dham)यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) आक्षेपार्ह विधान करीत नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या दिव्यशक्तीच्या दाव्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप नोंदविल्यानंतर देशभरातून टीकेची झोळ उठली. यामुळे धीरेंद्र शास्त्री अचानक प्रकाशझोतात आले. या प्रकरणात त्यांनी काहीशी सावध भूमिका घेतलेली दिसली. पण, त्यानंतर संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. यावरून त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari ) यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असे ते म्हणाले. आता मिटकरी यांच्या विधानावरून वाद सुरू झाला आहे.
मिटकरी म्हणाले की, शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा- बाबांचे पीक फोफावले आहे. पळपुटा आणि अक्कलशून्य असलेला बागेश्वर बाबा, त्याला श्याम मानव यांनी ४० लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलतो आहे. आईसाहेब ऊर्फ जिजाबाई स्वत: भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केले आहे. मला असे वाटते की वारकरी सांप्रदाय काय आहे, हे या वेड्याला माहिती नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितले आहे. अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असे वाटते की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा, असेही ते म्हणाले.