नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडली? महाविकास आघाडीचा निर्णय

0

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागांवरील निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक बुधवारी पार पडली व या बैठकीत कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची, याचा निर्णय झाला. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसकडून शिवसेनेसाठी सोडण्यात आल्याची चर्चा असून त्याला अद्याप अधिकृत सूत्रांकडून पुष्टी मिळालेली नाही. काँग्रेस अमरावती व नाशिक पदवीधरची जागा लढणार असून औरंगाबादची जागा राष्ट्रवादी तर कोकणात शेकाप लढणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटातून दिली जात आहे. (Legislative Council Elections) तर बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून मविआतील सर्व पक्ष निवडणुकासांठी अर्ज भरणार आहेत व तसेच यासाठी सर्वांमध्ये समन्वय साधला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी सांगितले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठीची जागा काँग्रेस लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी केली होती. मात्र, आता ही जागा शिवसेनेसाठी सोडली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्याचे बोलले जात आहे. नागपूरच्या जागेवर एकमत करुन उमेदवारी देण्याचा प्रयत्न असल्याचे पटोले यांनी नंतर सांगितले. नागपुरातून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अर्ज भरण्यात आला आहे. नागपुरात भाजपने पुन्हा नागो गाणार यांना मैदानात उतरविले आहे.