पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोग्य यंत्रणेला सुचना
राजोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
चंद्रपूर, दि. 24 : रुग्णालयात उपचाराकरीता आलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर वेदना असतात. मात्र उपचार केल्यानंतर परत जाताना त्याच्या चेह-यावर आनंद आणि समाधान दिसेल, या भावनेने आरोग्य केंद्रावर काम व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राजोली (ता.मुल) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व गिलबिली (ता. बल्लारपूर) येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,भाजपा महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, संध्याताई गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी श्री.थेरे, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, अलका आत्राम, नामदेव डाहुले, आनंदराव पाटील ठिकरे, चंदुभाऊ मारगोनवार, जयश्री वलकेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्रास भेट दिली असता डॉक्टर पावसात छत्री घेऊन रुग्णांची तपासणी करीत असल्याचे नजरेस पडले. त्यावेळी या आरोग्य केंद्राची बांधणी करण्याचा संकल्प केला. या आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी अनेक संकटे होती. जमिनीचा प्रश्न होता. मात्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाने पूर्ण करण्याचा भाव मनात होता. आज राजोली येथे अप्रतिम, अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार झाले आहे.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे मंदिर व्हावे. जिल्ह्यामधील आरोग्यसेवा बळकट व्हाव्यात, यासाठी मी नेहमी आग्रही आहे. निधी उपलब्धतेसाठी राजोली तसेच मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मानोरा, कळमना, ताडाळी, बेंबाळ, जिभगाव, नांदाफाटा, भंगाराम तळोधी, विरुर स्टेशन, शेगांव, नान्होरी, उमरी पोतदार, गांगलवाडी, शेणगाव व सावरी अशा एकूण 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालयासारखे आहेत. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण झाले असून रुग्णसेवेत कार्यान्वित आहे. घुग्गूस येथील ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष बाब करून या रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.
अत्याधुनिक व सोयी सुविधायुक्त वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय : जिल्ह्यात अत्याधुनिक व सोयीसुविधायुक्त वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभे राहत आहे. देशातील 22 एम्स हॉस्पिटलच्या बरोबरीचे चंद्रपूरातील मेडीकल कॉलेज असेल. या मेडिकल कॉलेजमध्ये 3 टेस्ला एम.आर.आय. मशीन खरेदी करण्यासाठी शिर्डी संस्थानने 8 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. तर 7.50 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देण्यात आले असून 14.50 कोटी रुपयाची एम.आर.आय मशीन चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये लावण्यात येत आहे. या मेडिकल कॉलेजमधील फिजीओथेरपी युनिट सुसज्ज होत आहे.
कॅन्सर रुग्णासांठी टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल : जिल्ह्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. गावागावात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. या जिल्ह्याचा कॅन्सर रुग्ण मुंबईला उपचाराकरीता जाऊ शकत नाही. त्यामुळे चंद्रपुरातच टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल पूर्णत्वास येत आहे. अत्याधुनिक मशीन या हॉस्पिटलमध्ये बसविण्यात येणार असून टाटा कॅन्सर हॉस्पिटल लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालय इमारत बांधून तयार असून येत्या वर्षभरात स्त्री रुग्णालय देखील कार्यान्वित होईल.
कामगारांच्या उपचारासाठी अत्याधुनिक हॉस्पिटलला मान्यता : जिल्ह्यात उद्योग मोठ्या प्रमाणात असून सर्वाधिक कामगार आहे. मात्र, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालय नाही. त्यांच्या आरोग्य सेवेसाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे चार महिन्यापूर्वीच बल्लारपुर येथे तर चंद्रपूरमध्ये देखील ओपीडी केंद्र सुरू करण्यात आले. चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्ये 10 एकरमध्ये कामगारांच्या उपचारासाठी 100 खाटांच्या अत्याधुनिक हॉस्पिटलला मान्यता दिली. या शंभर खाटांच्या रुग्णालयात ऑपरेशन, विविध आरोग्य संदर्भसेवा पुढच्या सव्वावर्षात कामगारांना मिळेल.
मुंबई फिल्मसिटी(गोरेगाव)च्या माध्यमातून नेत्रचिकित्सा आरोग्य दवाखाना : राजोली येथे नेत्रचिकित्सा शिबिरे घेण्यात आली. चष्मे वाटप करण्यात आले. येथील नागरीकांना नेत्रचिकित्सा संदर्भात स्थायी व्यवस्थेसाठी मुंबई फिल्मसिटी(गोरेगाव)च्या माध्यमातून नेत्रचिकित्सा आरोग्य दवाखाना या मतदारसंघात देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. येत्या तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात फिरते नेत्रचिकित्सा रुग्णालय पोहोचून नागरीकांचे मोतीबिंदू तपासणी, चष्मे आदी नेत्रसंदर्भ सेवा मोफत दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या योजनाचा लाभ : शासनाने जीवनदायी योजनेत 1.5 लक्षावरून 5 लक्षापर्यंत वाढ केली. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र शासनाचे 6 हजार व राज्य शासनाचे 6 हजार असे एकूण 12 हजार रुपये वर्षाला महाडीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जाणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा तर सर्पदंश झाल्यास सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.
विविध विकास कामे : जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा उत्तम असावा, याकरिता शाळांचा विस्तार करून शाळा अत्याधुनिक करण्यात येत आहे. महिलांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणासाठी एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तर बाबूपेठ येथे 8.34 एकर परिसरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मुलमध्ये महिला महाविद्यालय विदर्भातील उत्तम असेल. स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने 11 कोटी 50 लक्ष रुपये खर्च करून स्किल डेव्हलपमेंटचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. गोसेखुर्दचे पाणी येथील तलावात यावे, यासाठी याअगोदरच मान्यता देण्यात आली. पळसगाव-आमडी, चिंचाळा व चिचडोह यासारखे अनेक सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या 1300 योजनांना मंजुरी दिली. जिल्ह्यात विकासाची अनेक कामे पूर्णत्वास येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत म्हणाले, ग्रामीण जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्याकरीता जिल्ह्यात एकूण 63 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. मुल तालुक्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी एक प्राथमिक आरोग्य केंद्र राजोलीची स्थापना 1985 साली झाली होती. राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधकामाकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आजपर्यंत राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संकुलाच्या बांधकामावर एकूण 5 कोटी 13 लक्ष 93 हजार 218 रुपये खर्च करण्यात आला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, दोन वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने, चार कर्मचारी निवासस्थाने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, संरक्षक भिंत, बगीचा, बोअरवेल, विद्युत पुरवठा, आवश्यक फर्निचर आदी खर्चाचा समावेश आहे. या इमारतीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, राजोली कार्यक्षेत्रातंर्गत 15 गावातील लोकसंख्येस आरोग्य सेवा दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार डॉ. प्रकाश साठे यांनी मानले.