नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) आज मुख्य व्याजदर म्हणजे रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली असल्याने आता रेपो दर ५.९०% वरून ६.२५ टक्क्यांवर पोहोचला असून वाढत्या महागाईला अंकूश लावण्यासाठी व्याज दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी (RBI Governor on Repo Rate) जाहीर केले. यावर्षी आतापर्यंत पाचवेळा रेपो दरात वाढ करण्यात आली असून त्याचा परिणाम म्हणजे रेपो दरात वाढ झाल्यास कर्जाचा व्याजदरही वाढतो. या निर्णयामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होणार आहेत, असे जाणकारांनी सांगितले. रेपो दरवाढीचा परिणाम म्हणून कर्जाचे ईएमआय वाढणार आहेत. त्यामुळे घर किंवा कर्जावर घेतल्या जाणाऱ्या वस्तु महाग होतील. त्यामुळे थेट खिशावर ताण पडू शकतो. यावर्षी पाचव्यांदा आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, या वर्षी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात मेमध्ये ०.४० टक्के, जून आणि ऑगस्टमध्ये ०.५० टक्के आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा ०.५० टक्के वाढ केली होती. आतापर्यंत यावर्षी २.२५% वाढ करण्यात आल्याने मध्यवर्ती बँकेचा मुख्य व्याजदर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने आगामी वर्षासाठी सीपीआय म्हणजे महागाईचा अंदाजित दर ६.७ टक्के कायम ठेवला आहे. मात्र, वर्षभरात महागाईचा दर ४ टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून तेच आमचे ध्येय असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
रेपो दरात वाढीमुळे कर्जे महागली असून आता नवीन व्याजदराने अधिक ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत आता कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.