नवी दिल्लीः लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी प्रकरणावरून आरोप केले होते. त्यावर आता राहुल यांना लोकसभा सचिवालयाने नोटीस जारी केली केली (LS Secretariate issues notice to Rahul Gandhi) आहे. मोदींविरोधात खोटी, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारी माहिती ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून या नोटीसवर 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. ही विशेषाधिकारभंगाची नोटीस आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंग केल्याच्या नोटीसवर लोकसभा सचिवालयाने त्यांना उत्तर मागितले आहे.
खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारत आरोप केले होते. राहुल यांनी मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा दावा भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात भाजप खासदारांनी ही नोटीस दिली आहे. आता लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवांनी राहुल गांधी यांना ईमेलवर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने गौतम अदानी यांच्यासंदर्भात जारी केलेल्या अहवालावरुन सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते. यावेळी लोकसभेत भाजप खासदारांनी पुरावा द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी राहुल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.