अनिल देशमुखांना भाजपने ऑफर दिली होतीः शरद पवार

0

वर्धा: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात जाण्यापूर्वी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. वर्धा येथे बोलताना पवारांनी हा दावा (NCP President Sharad Pawar) केलाय. अनिल देशमुख यांनी ती ऑफर धुडकावून लावल्यामुळे त्यांना कारागृहात रहावे लागले, असे पवार म्हणाले. पवारांच्या या दाव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार करताना आम्ही अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यामुळे आम्हाला ते शक्य नव्हते, असा दावाही महाजन यांनी केलाय.
देशमुख यांना मिळालेल्या कथित ऑफरबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशमुख यांना तुम्ही पक्ष, विचार आणि नेतृत्व बदला असे सांगण्यात आले. पण, त्यांनी मी संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेन, पण माझ्या पक्षाची साथ सोडणार नाही, असे सांगितल्याचा दावाही पवारांनी केलाय. यावेळी अनिल देशमुख यांनीही आपले अनुभव सांगताना नमूद केले की, मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन, पण समझोता करणार नाही, असेही ते म्हणाले. त्यावर गिरीश महाजन यांनीही अनिल देशमुख यांच्याकडूनच भाजप प्रवेशाचा प्रस्ताव दोनदा आला होता, असे सांगितले.