: नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागात व्याख्यान
नागपूर. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वच समाजातील पीडित व्यक्तीच्या शोषणाविरोधात आवाज उठविला आहे. सद्यस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत असलेल्या पाच मानवी मूल्यांचा स्वीकार महात्मा फुले यांनी त्याकाळी केला होता. त्यामुळे महात्मा फुले यांच्यामध्ये आधुनिकता होती, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर यांनी केले. विद्यापीठातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित ‘हिस्ट्री फ्राॅम बिलो’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेत ‘महात्मा फुले यांचे ऐतिहासिक समाजशास्त्र’ या विषयावर शुक्रवार, २४ मार्च २०२३ रोजी डॉ. बोरकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सहअधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी तर विभागातील डॉ. रवी खंदई उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट उलगळत पुणे येथे त्यांचे सामाजिक जीवन फुलल्याचे डॉ. बोरकर पुढे बोलताना म्हणाले. महात्मा फुले यांनी पेशव्यांचे पतन, पानिपत युद्ध, इंग्रजांचे आगमन, समाजातील अनिष्ट चालीरीती आदी विषयावर महात्मा फुले यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या साहित्यातून व्यक्त होते. ज्ञान, राज्य, धर्मसत्ता याबाबत महात्मा फुले यांचे असलेले विचार डॉ. बोरकर यांनी समजावून सांगितले. गुलामगिरी या पुस्तकातून फुले यांनी शूद्र -अतिशूद्र आर्य- अनार्य याचा उल्लेख केला आहे. पुणेचे सत्ता केंद्र आर्यांशी जुळलेले असल्याचे महात्मा फुले यांच्या लेखनातून दर्शवितात. शिवाय ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण याबाबत परखड विचार व्यक्त केले, असे डॉ. बोरकर म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालविवाह, केशवपण, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवरील अत्याचार, जाती व्यवस्था तसेच शूद्र अतिशूद्र यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविला. या सोबतच न्याय, समानता आणि बंधुता याचा समावेश सत्यधर्मात केल्याचे प्रतिबंब उमटत आहे. ‘ प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रता मिळाली पाहिजे’ असे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार होते, असेही डॉ. बोरकर म्हणाले.
मानव केंद्रित विचार व्हावा – डॉ. कोरेटी
वंचितच नव्हे तर सर्व समाजा करिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचार केला. व्याख्यानातून महापुरुषांच्या विचाराबाबत माहिती मिळते. या व्याख्यानातून मानव केंद्रित विचार होत असल्याचे प्रतिपादन सहअधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी केले. विद्यार्थी म्हणून ही तुमच्याकरिता सुरुवात आहे. प्रत्येक मनुष्याच्या समस्येबाबत विचार करीत त्यातून बाहेर काढण्याचा नवीन विचार समोर येतो. महात्मा फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. याबाबत अधिक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.