टिप्परची एसटीला धडक, २२ प्रवासी जखमी

0

मेहकर – खामगाव मार्गावर भीषण अपघात

बुलढाणा. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भरधाव टिप्परने जोरदार धडक (ST Bus Tipper Accident ) दिली. या भीषण अपघातात एसटीतील 22 प्रवासी जखमी (22 प्रवासी जखमी) झाले. जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital Mehkar ) दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी दुपारी मेहकर – खामगाव मार्गावरील (Mehkar – Khamgaon route) जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या अंडरपास नजीक हा अपघात झाला. घटनेनंतर वाटसरू आणि जवळच्या गावातील मंडळी मदतीसाठी धावून आली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांच्या काचा फुटल्या. एसटीचा समोरचा भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाला. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. एसटी बसला होणारे अपघात प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस मेहकर आगाराची आहे. ती शेगाववरून मेहकरकडे प्रवाशांना घेऊ निघाली होती. दुपारची वेळ असल्याने बहुतेक प्रवासी आपसात बोलण्यात व्यस्त होते किंवा काही झोप घेत होते. त्याचवेळी रेती घेऊन जाणारा टिप्पर विरुद्ध दिशेने येत होता. टिप्परने अगदी समोरासमोर धडक दिली. यात २२ प्रवासी जखमी झाले असून बहुतेक प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील आहे. अपघातातील जखमींची नावे आशू बोरकर, सीताराम दळवी, मदन गाडे, सतीश गायकवाड, विनोद गायकवाड, विमल गायकवाड, रामेश्वर भोपळे, पूर्णाजी बोरकर, रामेश्वर हिवरकर (हिवरा खुर्द ता. मेहकर), माधव नलगे ( ईसोली ता. चिखली) रत्नकला काळे (डोनगाव ता. मेहकर), किरण जाधव, श्रावणी जाधव, पांडुरंग भोलनकर (पिंपरखेड, ता. चिखली) रुखिमिनी अवसरमोल (घाटनांदरा ता. मेहकर) मनोज राठोड (विठ्ठलवाडी ता मेहकर) सिद्धार्थ वानखेडे (कल्याना ता. मेहकर) प्रवीण बोरकर (पलसखेड ता. चिखली) परशुराम देवकर (ब्रम्हपुरी ता. मेहकर) वाल्मिक मुरडकर, यश उलटे (अमडापूर चिखली) वासुदेव फोलके (जानेफळ ता. मेहकर) सविता राजू मोंधाला (ता. मेहकर) अशी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा