
नागपूर(Nagpur) दि. 13 एप्रिल 2026 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी नागपूर शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांसाठी महावितरणने कंबर कसली आहे. दीक्षाभूमी, संविधान चौक, डॉ. आंबेडकर चौक, इंदोरा, रामेश्वरी, मेडीकल चौक, भगवान नगर आणि जयभीमनगर यांसारख्या प्रमुख केंद्रांवर अनुयायांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, अखंडित वीजपुरवठा आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या भागातील देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, संपूर्ण उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अडथळे दूर केले आहेत. विशेषतः उंच चित्ररथांना अडथळा ठरू शकणाऱ्या लोंबकळणाऱ्या वीज तारा आणि सर्व्हिस वायर्सची उंची सुरक्षित स्तरावर वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी उघड्या तारा बदलून त्या जागी अत्याधुनिक इन्सुलेटेड केबल्स टाकण्यात आल्या आहेत. उत्सवाच्या काळात कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी मुख्य ठिकाणांवर कर्मचाऱ्यांची विशेष पथके तैनात राहतील, असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
सुरक्षिततेचे भान, हेच खरे अभिवादन: तांत्रिक सज्जतेसोबतच महावितरणने सामाजिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मिरवणूक, डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात कोणताही अपघात घडू नये, यासाठी आयोजकांना काही महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वागत कक्ष किंवा रोषणाईसाठी वीज खांबावरून अनधिकृतपणे वीज घेणे टाळावे, तसेच पिण्याच्या पाण्याचे स्टॉल्स विद्युत डीपी किंवा खांबांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावेत. चित्ररथांवरील ध्वज किंवा सजावट करताना वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तारांचा अंदाज घेऊनच हालचाली कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मिरवणुकीसाठी खास मार्गदर्शक तत्त्वे: मिरवणूक सुरू करण्यापूर्वी आयोजकांनी ठरवलेल्या मार्गातील विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती आधीच घ्यावी. शक्य असल्यास कमी उंचीच्या वाहनांचा वापर करावा आणि जनरेटर ट्रॉली सुरक्षित अंतरावर ठेवावी. मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक नेमून त्यांना धोक्याची सूचना देणारी साधने द्यावीत. कुठेही तुटलेल्या वायर्स किंवा विजेची ठिणगी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवून नागरिकांनी त्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित मदतीसाठी महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या 1912, 1800-233-3435, 1800-212-3435 किंवा 022-50897100 या क्रमांकावर संपर्क साधावा. उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक अभियंता आणि ‘जनमित्रांचे’ मोबाईल क्रमांक आपल्याकडे ठेवावेत, जेणेकरून वेळेवर समन्वय साधणे सोपे होईल. “उत्सवाचा आनंद सुरक्षिततेचे भान राखून साजरा करणे हीच महामानवाला खरे अभिवादन ठरेल,” असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर














