ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, तृणमूल काँग्रेसची मागणी

0

कोलकाता-आम्हाला पंतप्रधान पदात रस नसल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्याची संधी हेरून तृणमूल काँग्रेसने या पदासाठी दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार करण्यात यावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. यातून आता विरोधकांच्या आघाडीतील मतभेद पुढे आल्याचे दिसत आहे.  Make Mamata Banerjee PM candidate, Trinamool Congress demand 
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षां मोर्चेबांधणी सुरू असून कालच २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नावाच्या आघाडीची घोषणा केली होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. कॉंग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली असून, तृणमूल कॉंग्रेसकडून ममता बॅनर्जी यांचे नाव तृणमूलकडून पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेल तर ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवण्यात यावे, अशी आमची इच्छा आहे, असे खासदार रॉय यांनी सांगितले. आता या भूमिकेवर इतर विरोधी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागलेले आहे.