पुणे (Pune) ५ नोव्हेंबर २०२४ :- राज्यातील सामाजिक आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील थेट राजकीय पक्षांसोबत दोन हात करणार होते.पंरतु, ऐन वेळी जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा आरक्षण विरोधकांना मोठी चपराक बसली आहे. जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला असता, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला.
जरांगेंच्या नावावर मराठा, ओबीसी आणि मुस्लिम मतं मराठा उमेदवारांच्या मागे एकवटली असती. अशात भाजप विरोधी मतांचे विभाजन होवून थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला असता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. जरांगेच्या भूमिकेला ओबीसी बांधवांचा सर्वच स्तरातून पाठिंबा राहील, असे देखील ते म्हणाले. मराठा आंदोलनाचे राजकारण होण्यापासून त्यामुळे वाचले आहे.निवडणूक न लढण्याच्या जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळेल, हे निश्चित झाल्याचे पाटील (Hemant Patil) म्हणाले.
मराठा आंदोलक निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्यामुळे अनेक उमेदवार पाण्यात देव ठेवून बसले होते.विविध मतदार संघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वीच जरांगेंची भेट घेवून त्यांच्याकडे सहकार्य करण्याचे साकडे घातले होते.आता जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) बदललेल्या भूमिकेचा फटका कुठल्या राजकीय पक्षाला सर्वाधिक बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच, असे पाटील म्हणाले. या निवडणुकीत मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाजाचा कल महत्वाचा ठरणार आहे.ओबीसींनी आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.विद्यमान सरकारचे समर्थक असलेल्या उमेदवारांना त्यामुळे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लवकरच जरांगे यांची भेट घेवून आंदोलनाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करणार असल्याचे पाटील म्हणाले.