यवतमाळ, गोंदिया, बुलडाण्यात पिकांचे नुकसान ; शेतकरी चिंतातूर
यवतमाळ. संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या अवकाळी पावसाने विदर्भालाही तडाखा दिला (Unseasonal rains also hit Vidarbha ) आहे. शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी सकाळी काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरश झोडपून काढले. यवतमाळ, बुलडाणा, गोंदिया (Yavatmal, Buldana, Gondia ) जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसामुळे शेतातींल पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटासह बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान (Heavy loss of crops) झाले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. काही भागात आज सकाळपासून पाऊस सुरू होता. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा गेल्य 5 दिवसांपासून संप सुरू आहेत. अशात तातडीने पंचनामे करून घेणे कसे शक्य होईल हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
गोंदिया शहरासह जिल्ह्यात शनिवारची पहाट विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस घेऊन आली. जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे . देवरी, सालेकसा तालुक्यांत शेत शिवारात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यात ही काही भागातही पावसाने हजेरी लावली. फळबागांसह गहू, हरभरा, उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा, यावतमाळातील स्थितीही काही वेगळी नाही.
यवतमाळच्या समता मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच शुक्रवारी रात्री आलेल्या वादळी पावसाने या महोत्सवाच्या ठिकाणी दैनावस्था झाली. सर्वत्र पाणी साचून चिखल झाल्याने स्टॉलधारकांचे हाल झाले. कर्मचाऱ्यांचा संप आणि अवकाळी पावसाचा फटका अशा दुहेरी संकटात हा कृषी महोत्सव सापडला आहे. या कालावधीत राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असतानाही कृषी विभागाने हा पाच दिवसीय कृषी महोत्सव कशासाठी घेतला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.