कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : संदेश सिंगलकर यांची मागणी
नागपूर. जी -20 परिषदेअंतर्गत नागपुरात (Nagpur) सी-20 बैठक होणार आहे. त्यासाठी रविवारी जगभरातील प्रतिनिधी पोहोचतील. यानिमित्ताने शहरात जय्यत तयारी सुरू आहे. विदेशी पाहूण्यांचे डोळे दिपतील, अशी रोषनाई सर्वच प्रमुख मार्गांवर करण्यात आली आहे. शहराची वास्तविकता या झगमगाटआड लपविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक झाडावर लाईट लावण्यात आले आहे. त्यासाठी सर्व नियम पायदळी तुडवित थेट झाडांना खिळे ठोकण्यात आले (trees were nailed). झाडांना तब्बल चार लाख खिळे ठोकून रक्तबंबाळ करण्यात आले असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्या महापालिकेच्या कंत्राटदारांनीच हे कृत्य केले आहे. या प्रकारावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संदेश सिंगलकर (Congress state office bearer Sandesh Singalkar ) यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार देऊन झाडांवर बेकायदेशीरपणे खिळे ठोकणारे कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि कामाचा मोबदला रोखण्याची मागणी केली आहे.
झाडांना खिळे ठोकून अपाय करणे हे पर्यावरण कायद्याचे वृक्ष संवर्धन अधिनियमांचे उल्लंघन आहे. कायदा आणि नियमाच्या उल्लंघनावरुन महापालिकेने शहरातील नागरिकांना दंड ठोठावला आहे. परंतु, आता हे खिळे ठोकणाऱ्या महापालिकेकडून हा दंड कोण वसूल करणार? शहरातील झाडांचे झालेले नुकसान कोण भरुन काढणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष जतन अधिनियमान्वये झाडांवर खिळे ठोकण्यासह कुठलीही लोखंडी वस्तू ठोकण्यावर बंदी आहे.
संदेश सिंगलकर यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. 3 हजार झाडांवर 1 लाख खिळे ठोकण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मांडलेला उन्माद तत्काळ थांबवा, ठोकलेले खिळे तत्काळ काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे उघडपणे हा प्रकार करण्यात आला. त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.