Maoist movement on the backfoot | 25-page booklet issued by Maoists | माओवादी चळवळ बॅकफूटवर | माओवाद्यांचे २५ पानांचे बुकलेट जारी
नागपूर : दंडकारण्यातील मागील दोन दशकांतील चकमकींमध्ये ५,२२९ माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा यंत्रणेने २०११ नंतर आपली रणनीती बदलल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला. या बदलामुळे माओवादी चळवळ बॅकफूटवर गेली असून, सुरक्षा दलाच्या कारवाया त्यांच्यावर भारी ठरू लागल्या आहेत. पहिल्यांदाच माओवाद्यांनी आपल्या माहितीपुस्तिकेत या गोष्टीची कबुली दिली आहे, ज्यामुळे दंडकारण्यातील चर्चेला अधिक गती मिळाली आहे.
माओवादी संघटनेच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माओवाद्यांनी २५ पानांचे एक विशेष बुकलेट जारी केले आहे. यात संघटनेच्या घडामोडी आणि चळवळीतील बदलांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. मुप्पाला गणपतीच्या नेतृत्वाखाली २००४ मध्ये भाकपा माओवादी संघटनेची स्थापना पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या एकत्रीकरणातून झाली होती.
या बुकलेटमध्ये १,००० पेक्षा अधिक महिला माओवाद्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तसेच, माओवादी संघटनेचे वरिष्ठ नेते किशनजी, आझाद, रामकृष्ण यांच्यासह २२ नेत्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात आठ पोलिट ब्युरो सदस्यांचा समावेश आहे. संघटनेच्या वेगवेगळ्या पदांवरील अनेक माओवादी ठार झाल्याचेही या बुकलेटमध्ये दिलेले आहे.
– गुरिल्ला वॉरफेअर आणि सुरक्षा दलांचे हल्ले
२०११ पर्यंत माओवाद्यांनी गुरिल्ला वॉरफेअरचा वापर करून सुरक्षा दलांना आव्हान दिले होते. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि राणीबोधली येथे मोठे हल्ले झाले होते, ज्यात ७६ आणि ६० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. परंतु, सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांमुळे माओवादी संघटना बॅकफूटवर गेली आहे.
दंडकारण्यातील माओवाद्यांचे बालेकिल्ले असलेल्या दुर्गम भागांत आता पोलिस ठाण्यांची उभारणी झाली आहे, आणि सीआरपीएफसारख्या निमलष्करी दलांचे कॅम्प वाढले आहेत. या भागात आता तीन हजारांपर्यंत जवान पाठवले जातात, जे माओवाद्यांचा शोध घेत गावांना घेरतात. त्यामुळे माओवाद्यांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात अंकुश आला आहे.
– बुकलेटमधील आकडेवारी
- बुकलेटमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यांसह ठार झालेले जवान, माओवादी आणि इतर घटनांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार, ५,२२९ माओवादी ठार झाले असून, ३,०९० जवानांनी प्राण गमावले आहेत.