१५ ते २५ डिसेंबर दरम्यान गोवर लसीकरण विशेष मोहिम

0


-मनपा मुख्यालयी टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर : नागपुरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी राज्यातील काही भागात गोवर (मिझल्स) ची साथ पसरत असल्याने गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान अंतर्गत गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात १५ ते २५ डिसेंबर दरम्यान व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी आज टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिली. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणा-या नियमित लसीकरणासंदर्भात व मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम टास्क फोर्स समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे मंगळवारी पार पडली. बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, बलबीरसिंग विल, डॉ. मीनाक्षी माने, डॉ. मेघा जैतवार, डॉ. प्रीति झरार, डॉ. बकुल पांडे, डॉ. प्रिया मेश्राम, डॉ. विवेकानंद, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. अतीक खान, डॉ. विजय कुमार तिवारी, आरोग्य व एनयूएचएम समन्वयक दीपाली नागरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर आणि रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचा मानस यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी देण्यात आली असली तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी. यासाठी आरोग्य सेविका, आशा वर्कर तसेच प्राथमिक उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा तसेच व्यापक लसीकरण मोहिमेस यशस्वी करण्यासाठी पालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा आणि गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन टास्क फोर्स समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जोधपुरी गुलाबजामची भाजी आणि कणकेचे वांगे रेसिपी|Gulab Jamun Ki Sabji & kankiche Wangi Recipe|Epi. 52

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा