

राज ठाकरेंवर टीका केल्याने हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अकोल्यात हा प्रकार घडला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांनी काल वक्तव्य केलं होतं. यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी (MNS workers) अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.