काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य : अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच
मुंबई. राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानींचा (Industrialist Gautam Adani ) हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध लोकसभेत उघड केले. यामुळे घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत राहू, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole ) यांनी केले आहे. महिलांवरील बलात्कारासंदर्भात राहुलगांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. त्यावर प्रतिक्रया देताना नाना पोटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टार्गेट केले.
नाना पटोले म्हणाले की, अदानी समूहाच्या महा घोटाळ्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेची लाखो कोटी रुपयांची स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी मधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहाचे शेअर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. पण, सरकार चौकशी करण्याऐवजी ४५ दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर नोटीस पाठवून चौकशीसाठी त्यांच्या घरी पोलिस पाठवत आहे, ही हुकुमशाहीच असल्याचे ते म्हणाले. अदानी समूहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशातून गैरमार्गाने गुंतवल्याचे समोर आले आहे. पण नरेंद्र मोदी सरकार या घोटाळ्याची चौकशी करत नाही. खासदार राहुल गांधी यांनी यासंदर्भात संसदेत आवाज उठवला, पण सरकारने त्यांच्या भाषणाचा निम्म्याहून अधिक भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकला. विरोधी पक्षांनी सातत्याने मागणी करूनही सरकार अदानी घोटाळ्याबाबत संसदेत चर्चा का करत नाही. अदानी समूहाशी मोदी सरकारचे नेमके काय संबंध आहेत जे चौकशीतून बाहेर येतील म्हणून सरकार चौकशीला घाबरत असल्याचे त्यांनी नमूद केले.