केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा घणाघात ः राहुल गांधींच्या चोकशीवर प्रतिक्रिया
नागपूर. काँग्रेसने (Congress) देशाला लुटण्याचे काम केले आहे. नोटीसांचे येणे- जाणे आता सुरूच राहणार आहे. जे केले त्याचे फळ भोगावेच लागणार आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. सोनीया काँग्रेसचे युवराज असलेले राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या विचारांवर घाला घातला आहे. त्यांना देशद्रोह्यांच्या पंगतीत बसविले तरी ते कमीच ठरेल, असे टीकास्त्र केंद्रीय पर्यावर मंत्री अश्विनी कुमार चौबे (Union minister Ashwini Kumar Choubey ) यांनी आज डागले. आज ईडी, आयटी, पोलिसांच्या नावाने गळे काडून ओरड सुरू आहे. पण, ते आपले काम करीत आहे. या सर्व स्वयत्त संस्था आहेत. त्यांच्यवर सरकारचा कुठलाही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरेश भट सभागृहात आयोजित होमिओपॅथी समिटच्या निमित्ताने नागपुरात आलेले चौबे यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला.
अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, गत 9 वर्षांपासून देशात भाजप सरकार आहे. आजवर एकाही मंत्र्यावर छोटा आरोप लावता आला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही लोकांची चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर नकली काँग्रेसचे रूप धारण करून देशावर सत्ता काबीज करण्यात आली. ही मंडळी भारताला सामर्थ्यवान, विश्वगुरू झालेले कदापी पाहू शकत नाही. सोनीया काँग्रेसच्या युवराजाने विदेशात जाऊन इथल्या लोकशाहीवर बोलून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. याच युवराजांचे देशव्यापी अभियान ‘टायटाय फिश’ झाले. लोकांनी बहिष्कार टाकला. यामुळे त्यांना बाहेर जाऊन बोलावे लागले. अशा या युवराजाला भारतीय जनता कदापी सहन करणार नाही. त्यांना देशद्रोही म्हणून ओळखले जाईल, असे मत त्यांनी नोंदविले.
-तर खासगी वाहनेही स्क्रॅप होतील
वायूप्रदूषण कमी करण्यासाठी देशव्यापी पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी शासकीय वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच या पॉलिसीसंदर्भात आढावा घेतला. 15 वर्षे जुन्या खासगी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाईल. स्थिती योग नसल्यास ही वाहने देखील स्क्रॅप केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भासह महाराष्ट्रासाठी भरिव तरतूद करण्यात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. सोबतच पर्यावरणाचा समतोल साधण्याचेही कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.