हात तोंडाशी आलेले पीक मातीमोल, शेतकरी संकटात
नागपूर. संपूर्ण राज्यात थैमान घातल्यानंतर रविवारी दुपारी अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यालाही तडाखा दिला. कळमेश्वर, काटोल, नरखेड, मौदा तालुक्यांसह लगतच्या भागांतही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. हिंगणा, वाडीलाही वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागात गारांचा खड पडल्याने हिमवृष्टी होणाऱ्या भागांसारखे चित्र जिल्ह्यातही दिसले. अनेक गावांमध्ये शेतात चिखलच चिखल दिसून येत आहे. अस्मनी अवकृपेमुळे शेतातील उभे पीक आडवे झाले. संत्रा, मोसंबीसोबतच गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले गेले आहे. झालेले नुसकान बधून शेतकऱ्यांचा डोळ्यांत आसवांचा चिखल झाल्याचे दिसून आले. विदर्भात सर्वदूर अशिच स्थिती दिसून येत आहे. तातडीने पंचनामे करून भरिव आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान विभागाने पुन्हा अवकाळी फडका बसण्याची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडली आहे.
अवकाळी पावसाने रविवारी दुपारी जिल्ह्यात हजेरी लावली़. कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, सवंद्री, खुमारी येथे गारपीटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काटोल तालुक्यातील सोनोली, मेंडकी, गोधणी, गोंडी दिग्रस, झिल्पा, इसापूर, डोंगरगाव, पठार, चणकापूर, माळेगाव, तर कळमेश्वर तालुक्यातील उबाळी, मोहपा, सुसुंद्री, सवंद्री, खुमारी, कोहळी, मांडवी व इतर परिसरामध्ये रविवारी दुपारी अचानक प्रचंड गारपीट झाली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – सलील देशमुख
रविवारी काटोल व नरखेड तालुक्यात मोठया प्रमाणात आलेल्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अश्या परिस्थीतीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तो अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केली आहे.
त्यांनी काटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिपचे कृषी सभापती प्रविण ऊर्फ बालु जोध, पंस सभापती संजय डांगोरे, माजी उपसभापती अनुप खराडे यांच्यासह सरंपच, ग्रामपंचायत सदस्य, नायब तहसीलदार, खंडविकास अधिकारी पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.