नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याला दोन दिवस राहिले असताना पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. तबबल साडेतीन हजारावर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कडक सुरक्षा व्यवस्थेचे अभेद्य जाळे उभारले जात आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंगस समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी लावणे सुरू झाले आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने मोदी यांची ही गुजरातच्या विक्रमी विजयानंतर होणारी पहिलीच जाहीर सभा आणि यात हजारो कोटींच्या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याने भाजपतर्फे कुठलीही संधी सोडायची नाही असे मायक्रोप्लॅनिंग सुरू आहे. मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व भाजपाच्या लोककल्याणकारी योजनांची व धोरणांची माहिती भाजपा संघटनेत सामील नसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी आजपासून’ फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात “Friends of BJP” पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण महामंत्री अनिल निधान, महादुला नगरध्यक्ष राजेश रंगारी, सरपंच कोराडी नरेंद्र धनोले, भाजपा महादुला शहराध्यक्ष प्रीतम लोहासारवा, सरपंच लोणखैरी लीलाधर भोयर, उपसरपंच आशिष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.