नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याकडे (PM Modi`s Nagpur Visit) नागपूरकरांचे लक्ष लागलेले आहे. आता पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची माहिती पुढे येत असून ते कस्तूरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार (Pm Modi to travel in Metro) असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास करतील, अशी माहिती मिळत आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या 521 किमी महामार्ग, नागपूर मेट्रोचे फेज 2 सह विविध प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी नागपुरात येत आहे. त्यांच्या नागपूर दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी सर्वच स्तराव व्यापक कामे सुरु आहेत.
पोलिस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी 9.25 च्या सुमारास ते नागपुरात दाखल होणार आहेत. ते कस्तूरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास करतील. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल नागपुरात दाखल झाले आहे. पंतप्रधान भेट देणाऱ्या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच नागपूर मेट्रो , रेल्वे आणि एम्सच्या अधिकाऱ्यांच्याही बैठका सुरु असून तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधानांचा मुख्य कार्यक्रम एम्स येथे होणार असून त्यासाठी सभामंडप तयार करण्यात आला आहे. सुमारे 30 हजार व्यक्ती कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचा अंदाज असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्यांचाही समावेश असणार आहे.