महाराष्ट्राच्या वेशीवरच रेंगाळलेला मान्सून आता सक्रीय झाला आहे. गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता शनिवारी मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
शुक्रवारी रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली. २९ जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले असून पुढचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. शनिवारी मुंबईत ११५.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.