इतकी क्रूर झाली माणसं?

0

पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर म्हणाले, माझ्या बारा वर्षाच्या सेवेत मी असा खून पाहिला नाही.. त्याच्या” लिव्हरचे चार तुकडे केले गेले, पाच फासळ्या तोडल्या गेल्या, डोक्यात १५ फ्रॅक्चर केले गेले, छाती फोडली गेली, मान मुरगळून टाकली होती. गुन्हा एकच. तो पत्रकार होता…

तो मुकेश चक्राकर होता…त्याने कुठलासा एक घोटाळा उघडकीस आणला होता.

दुसरी घटना. बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचं. अंग छिन्नविछिन्न करून, शरिराचे काही अवयव कापून, मनाचा थरकाप उडवणारी अत्यंत क्रूर असा खून या सरपंचाचा झाला. कट कारस्थान करून संतोष देशमुख यांना संपवण्यात आले. त्यांचा गुन्हा एकच. त्यांनी पवन चक्की चालवणाऱ्या एका उद्योजकाला‌ काही लबाड राजकारण्यांनी चालवलेल्या खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला होता.

आपला समाज दिवसेंदिवस प्रगती करतो आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री, आधुनिक साधनं, सुखसुविधा, भौतिक सुविधा, आरामदायी जीवन पद्धती उपलब्ध होत असताना माणसं अशी बेभान, बेताल का वागतहेत. त्याही पलीकडे, समाजमन असं क्रूर, निर्दयी का बनत चाललं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वरून प्रसारीत होणाऱ्या गॅंग्स ऑफ वासेपूर पासून तर अनेकानेक मालिकांमध्ये चित्रीत झालेली, मनाचा थरकाप उडविणारी दृश्य मन सुन्न करणारी असतात. इतक्या सहजपणे बंदुकीच्या गोळ्या झाडून समोरच्या व्यक्तीचा जीव घेणारी, धारदार शस्त्रांनी गळे चिरून टाकणारी, तुकडे तुकडे करून मृतदेहांची विल्हेवाट लावणारी दृश्य काल्पनिक असावीत असं वाटत होतं. कार्तिक असं करू धजणारी निर्दयी, क्रूर माणसं जगात अस्तित्वात असतील, यावर विश्वास बसत नाही. पण सरपंच संतोष देशमुख आणि पत्रकार मुकेश चक्राकार यांचा अत्यंत वाईट पद्धतीने खून करणाऱ्या नराधमांनी हा समज खोटा ठरवला आहे. डोक्यावर घण हाणणारी, गळे चिरणारी, मृतदेहही छिन्नविछिन्न करण्याचे काळीज लाभलेली माणसं या भूतलावर, या समाजात आपले असं राखून आहेत, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणाऱ्या या घटना आहेत. सारंच अविश्वसनीय आहे.

समाज नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडतो. परवा पर्यंत मुंबईतल्या गॅंगवाॅर बद्दल ऐकून होतो. त्यात गोळ्या झाडून एकमेकांना संपवण्यासाठीची कृत्ये होत होती. पण त्याबाबत तितकेसे आश्चर्य कधी वाटले नव्हते. कारण त्यात दोन्ही बाजुला गुंड प्रवृत्तीची माणसं असायची. फारच फार एका बाजूला पोलिस आणि दुसरीकडे हे गुंड असे चित्र असायचे. त्यात गुंड मारले गेले तरी त्याचे वाईट वाटण्याचे कारण नसायचे. शिवाय, त्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माणूस मेला, एवढीच कथा असायची. गुंडा असला तरी त्याच्या शरीराचे हाल कुणी केल्याचे कधी ऐकले नव्हते. पण, आता तर मानवी निर्दयतेनेही परिसीमा गाठलेली दिसते आहे. एरव्ही, लिव्हरचे चार तुकडे केले गेले, पाच फासळ्या तोडल्या गेल्या, डोक्यात १५ फ्रॅक्चर केले गेले, छाती फोडली गेली, मान मुरगळून टाकली, अवयव कापले गेले…हे कशाचे लक्षण आहे? असं करू शकणारी जीवंत माणसं मेलेल्या मनाची नाही, तर आणखी काय आहेत? कुठून आले एवढे क्रौर्य माणसात? अरे, इंजेक्शन टोचलं तरी खळकन् डोळ्यात पाणी यावं इतक्या हळव्या माणसांच्या दुनियेत जीवंत माणसं सहज मारून टाकणारी निर्दयता आली कुठून?

संतोष देशमुख यांना तर‌ काही लोकांनी सभोवताल घेरून मारले म्हणतात. पाणी मागितल्यावर त्याच्या तोंडात लघुशंका करणे काय, मारत असताना त्यांच्या तडफडण्याचा व्हिडिओ तयार करणे काय…सारंच अविश्वसनीय, किळसवाणं आणि निर्दयतेचा कळस गाठणारे आहे. माणूसकी या स्तराला येऊन ठेपली आहे? इतकी पाषाणहृदयी झाली माणुसकी? निर्विकारपणे, नव्हे असूरी आनंद लुटत एखाद्याचे आयुष्य संपवता येऊ शकते? मस्साजोग आणि छत्तीसगडमध्ये घडलेला प्रकार तरी, हे धगधगते वास्तवच अधोरेखित करतो. फक्त चित्रपट अथवा सिरीयल मध्ये बघून कुणी इतके क्रूर वागू शकेल? की हे करू शकणारी मानसिकता आणि रक्तच वैगळं आहे? कुठले संस्कार, कुठली संस्कृती? फक्त धंदा आणि पैशापायी निर्माण झालेल्या शत्रूत्वाचा अंत असा व्हावा? आणि त्याला राजकीय आश्रय देखील मिळावा? असल्या खुनाचे प्लान करणारी, करू शकणारी माणसं राजकीय नेत्यांचा सभोवताल वावरणारी असावीत? राजाश्रयाच्या जोरावर मिरवणारी असावीत?

आता एकच व्हावे. प्रकरण मस्साजोगचे असो नाहीतर छत्तीसगडचे, खून करणारे हरामखोर आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी, कोणालाच सोडले जाऊ नये. अंगावर काटा उभा राहील, असले वागणे यांना सहज जमत असेल तर, या निर्लज्जांना फासावर लटकावणे, एवढा एकच पर्याय उरतो…

सुनील कुहीकर