

हिरे व्यापारी संजय शहांची आत्महत्या
मुंबई (Mumbai) २२ जुलै :- गेटवे ऑफ इंडिया येथे रविवारी सकाळी ६५ वर्षीय हिरे व्यापारी संजय शांतीलाल शहा यांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आर्थिक नुकसानीच्या नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले.
महालक्ष्मी येथील शीला अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह राहणारे शहा मधुमेह आणि रक्तदाबाने त्रस्त होते. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा हिरे व्यवसाय होता, जो गेल्या काही वर्षांपासून नुकसानीत होता. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या शहा यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे नेण्यास टॅक्सी चालकाला सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी समुद्रात उडी मारली. (Gateway of India) प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले, परंतु समुद्रातील लाटांमुळे अडचण आली. अखेर, शहा यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.