बोर्डा दीक्षित गावात तणाव
चंद्रपूर. गावातील दोन कुटुंबांमध्ये जुने वैमनस्य होते. त्यात शेतातील तणस खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी मिळून वृद्ध बैलमालकाला बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला (Murder of an old man). या घटनेनंतर मृताचे नातेवाईक कमालीचे आक्रमक झाले आहेत. आरोपींना अटक करून तत्काळ फाशीची शिक्षा द्या किंवा तसे आश्वासन लेखी द्या, या मागणीसाठी मृतकाच्या कुटुंबीयांनी मृतदेह चक्क आरोपीच्या घरासमोर नेऊन ठेवला (relatives kept dead bodies in front of accused’s house). हा संपूर्ण घटनाक्र बोर्डा दीक्षित (Borda Dixit village ) येथील असून या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती काही निवळू शकली नाही.
किसन लिंगाजी कुमरे (७५) रा. बोर्डा दीक्षित असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथील किसन कुमरे यांचे बैल शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यामधून चारा खात होते. याच कारणावरून काही जणांनी किसन कुमरे यांना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लाठीकाठीने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने कुटुंबीयांनी त्यांना झोपू दिले. बुधवारी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना बघितले असता त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी मृतदेह आरोपीच्या घरासमोर नेऊन ठेवला. जोपर्यंत आरोपींना अटक व फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बोर्डा दीक्षित गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृतदेह दिवसभर आरोपीच्या घरासमोर ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस, आरसीबीची टीम व दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते. शंभराच्या आसपास पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावात छावणीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. केशव गेलकीवार (५५), दामोदर गेलकीवार (४०), अक्षय गेलकीवार (३०), शुभम गेलकीवार (२३), तुळशीदास गेलकीवार (२०, सर्व रा. बोर्डा दीक्षित) अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय कल्पना केशव गेलकीवार यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.