सासरच्यांवर खुनाचा आरोप, महागावच्या वाघनाथ येथील घटना
यवतमाळ. सुमारे 10 वर्षांपूर्वी कुटुंबीयांची इच्छा आणि रितिरिवाजानुसार दोघे लग्नबंधनात अडकले. वंशवेलीवर दोन फुलेही उमलली. मात्र, सुखात सुरू असलेल्या संसाराला कुणाचीतरी नजर लागली. घरात वाद सुरू झाला. विवाहितेने मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक घरीच गळफास लावून आत्महत्या केली (Suicide of a married woman). महागाव तालुक्यातील वाघनाथ (Vaghnath in Mahagao taluka ) येथे ही घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच माहेरची मंडळीही पोहोचली. त्यांनी ही अत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप (Allegation of murder by in-laws ) केला. पोलिसांकडे रितसर लेखी तक्रारही दिली. पती आशिष, सासू रंजना, सासरे खुशाल, दीर आप्पाराव, जाऊ शुभांगी आणि नणंद निलूबाई अंबोरे यांनी संगनमताने वेणूताईचा हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. याच कारणासाठी अनेकदा सासरच्यांनी तिला मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुर्त दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे.
वेणू अशिष पानपट्टे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. धारमोहा येथील वेणूताई पंजाब ठाकरे हिचा विवाह वाघनाथ येथील आशिष खुशाल पानपट्टे यांच्यासोबत ३ मे २०१३ रोजी झाला होता. अलिकडे त्यांच्यात वाद होऊ लागले होते. पती आशिषने वेणूला मारहाण करून १ ऑगस्ट २०२२ रोजी माहेरी आणून सोडले होते. माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा त्याने लावला होता. तिने अनेकदा छळाची माहिती आई, वडील व भावांना दिली. मात्र, परिस्थिती पूर्ववत होईल, या आशेने माहेरचे तिची समजूत काढत होते. मंगळवारी सायंकाळी वेणूने फाशी घेतल्याचा निरोप फोनवरून मिळाल्यानंतर माहेरची मंडळी वाघनाथ येथे धडकली. तोपर्यंत तिचा मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात हलविला होता. तेथून सासरकडील सर्वजण मृतदेह बेवारस सोडून निघूनही गेले. मृताचा भाऊ ओमकार ठाकरे यांनी महागाव ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी ती दाखल करून घेण्यास रात्र घालवली.
वेणूच्या दोन्ही दंडावर, बरगड्यांवर आणि कानशिलावर मारहाणीमुळे काळे, निळे व्रण उमटलेले दिसत असून, तिचा सासरच्यांनी फाशी देऊन खून केला व आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप तिचा भाऊ ओमकार पंजाब ठाकरे यांनी तक्रारीतून केला आहे. शवचिकित्सा अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे. त्यावरून तपास केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.